खंडाळ्याच्या यात्रेत दोघांवर गोळीबार; मुख्य संशयित पसार, दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 09 May 2026


खंडाळा : येथील वार्षिक यात्रेच्या उत्साहात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मुख्य संशयित आरोपी अद्याप पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

​आशुतोष ऊर्फ बट्या संतोष जाधव (रा. साखरवाडी, ता. फलटण) असे या प्रकरणातील मुख्य संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष हा साखरवाडी गावात असतानाच त्याने काही जणांना पिस्तूल दाखवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी फलटण पोलिसांना दिली होती. फलटण पोलिसांनी याबाबत खंडाळा पोलिसांना तत्काळ सूचित केले होते. पोलीस यात्रेत त्याचा शोध घेत असतानाच मध्यरात्री गोळीबाराची ही दुर्दैवी घटना घडली.

​खंडाळा गावच्या यात्रेनिमित्त सुमित प्रदीप पवार (वय १५) आणि राजवीर नामदेव शिंदे हे दोघे रात्री तमाशा बघून घरी परतत होते. यावेळी त्यांचा धक्का आशुतोषला लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. या वादाचा राग मनात धरून आशुतोषने आपल्याकडील पिस्तूल काढून सुमित आणि राजवीर यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये सुमितच्या पोटात तर राजवीरच्या खुब्यावर गोळी लागली. गोळीबार केल्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांसह तिथून पळ काढला. अचानक झालेल्या या गोळीबाराने यात्रेत मोठी पळापळ झाली. यावेळी नागरिकांनी सतर्कता दाखवत पळून जाणाऱ्या तिघांपैकी एकाला पकडले, तर दोघे जण पसार होण्यात यशस्वी झाले.

​घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून खंडाळा आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी पथके रवाना केली होती. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासांतच दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आशुतोष आणि त्याच्या साथीदारावर यापूर्वीही मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील - मंत्री मकरंद पाटील
पुढील बातमी
पोवई नाका परिसरात दारूसाठ्यासह इको कार जप्त; किकलीच्या युवकावर गुन्हा

संबंधित बातम्या