सातारा तालुका पोलिसांचा जिल्ह्यात डंका; पाच प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी

चोरीच्या मालाची वसुली, दोषसिद्धीचे प्रमाण आणि गुन्हे उघडकीस आणण्यात उत्कृष्ट कामगिरी; पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरव

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : गुन्हे उघडकीस आणणे, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सातारा तालुका पोलीस ठाण्याचा गौरव करण्यात आला. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२६ या दोन महिन्यांत सातारा तालुका पोलिसांनी पाच महत्त्वाच्या प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी नोंदविली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांना दरमहा प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. याच उपक्रमांतर्गत सातारा तालुका पोलीस ठाण्याने चोरीच्या मालाची वसुली, दोषसिद्धीचे प्रमाण, गुन्ह्यांची उकल आणि मुद्देमाल निकाली काढणे या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच कासव तस्करी प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यातही पोलिसांना यश आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि सातारा शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या हस्ते संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यश
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, दादा स्वामी, राजू शिखरे, पंकज ढाणे, संदीप पांडव, सतीश बाबर, संदीप आवळे, सुनील भोसले, शिवाजी वायदंडे, विद्या कुंभार, शीतल भोसले, रामचंद्र गोरे, सोनाली आवळे, सोनाली मंडले, प्रवीण वायदंडे, संदीप फणसे, अभिजीत मोरे आणि प्रमोद सोनावले यांचा समावेश आहे.
या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. स्मिता जाधव यांचा उद्या आणि परवा झंझावात
पुढील बातमी
जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत न्यायालयीन निर्णयाचा परिणाम; महाबळेश्वरकडे राजकीय नजरा

संबंधित बातम्या