विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

by Team Satara Today | published on : 18 September 2026


सातारा : शेतातील विहिरींमधून पाणबुडी मोटारी चोरी करणाऱ्या तिघांना म्हसवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटारींसह सुमारे १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईमुळे मोटार चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकूडवाड येथील रविंद्र जालिंद कुंभार यांच्या चाहुर नावाच्या शिवारातील सार्वजनिक विहिरीतून सम्राट कंपनीची पाणबुडी मोटार चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २६०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अखिल विलास जाधव (रा. मानेवाडी-कुकूडवाड), आदित्य तानाजी पुकळे (रा. पुकळेवाडी) आणि वैष्णव विकास कोळी (रा. पुनर्वसन कॉलनी, मायणी) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिघांकडून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र, पोलिसी तपासात त्यांनी मोटार चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीची पाणबुडी मोटार तसेच अन्य दोन मोटारी हस्तगत करण्यात आल्या.
या तपासादरम्यान मोटार चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून, एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे तसेच पोलीस अंमलदार देवानंद खाडे, सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव आणि संतोष काळे यांच्या पथकाने केली. कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
पुढील बातमी
आपली फलटण मॅरेथॉन २०२६ ची दशकपूर्ती : २५ ऑक्टोबरला आरोग्य आणि आनंदासाठी धावणार फलटणकर

संबंधित बातम्या