सातारा : संपूर्ण भारतामध्ये मराठी बालरंगभूमीची समृध्द परंपरा असून, मराठी बालनाट्यालाही 66 वर्षांची समृध्द परंपरा लाभली आहे. मराठी बालनाट्यांचे सर्वात जास्त प्रयोग महाराष्ट्रात होत असतात. 2 ऑगस्ट 1959 रोजी पहिल्या व्यावसायिक बालनाट्याचा प्रयोग झाला म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे 2 ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून साजरा करणार असल्याची माहिती बालरंगभूमी परिषद सातारा शाखेचे अध्यक्ष डॉ. निलेश माने यांनी दिली आहे.
बालरंगभूमी परिषद ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेशी संलग्न संस्था असून, या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये मराठी बालनाट्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठी बालनाट्य दिवसानिमित्त मूख्य शाखा अध्यक्ष नीलम शिर्के-सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बालरंगभूमी परिषद सातारा शाखेतर्फे मोफत बालनाट्य शिबिराचे आयोजन, केसकर वाडा येथे गुरुवार बागेसमोर केले असून, या उपक्रमाला शहरातील बालकलावंतांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषद सातारा शाखेचे उपाध्यक्ष रसिका केसकर यांनी केली आहे.