सातारा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलांमध्ये लवकर होणारे शारीरिक बदल, एकतर्फी प्रेम, मोठ्या मुलांकडून होणारी फसवणूक अशा अनेक बाबी समोर येत आहेत. या अनुषंगाने आपल्या पिढीचे रक्षण करणेसाठी त्यांना योग्य - अयोग्य याची माहिती मिळण्यासाठी कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे तरच देशाचे भविष्य सुरक्षित आणि सक्षम राहिल.
आजच्या परिस्थितीमध्ये समाजात अल्पवयीन मुलांच्यात, मोबाईल, सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्स खेळणे, जुगारचे खेळ, पॉर्न व्हिडिओ पहाणे, परवाना नसताना वाहन चालवणे, तसेच व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे नकळत गुन्हेगारीकडे वळणे अशा गोष्टींचे प्रमाण वाढत आहे.
चुकीच्या घटना घडूच नयेत म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक वाटते.
यासाठी -
1) सातारा शहरामधील प्रमुख शाळा सूटताना आणि भरताना प्रत्येक शाळेच्या आवारात पोलीस जवान थांबविणेबाबत.
2) अल्पवयीन मुलांचे वाहन चालवण्याचे प्रमाण वाढत असून वाहन परवाना नसलेल्या मुलांच्या पालकांवर कायद्याप्रमाणे कारवाई करणेबाबत.
3) निर्भया पथकाद्वारे शाळा व महाविद्यालयात दर सहा महिन्यातून एक वेळा प्रबोधनाचा उपक्रम राबविणेबाबत.
4) अल्पवयीन मुलांना कायद्यानुसार सोशल मिडीयाच्या वापरास परवानगी नसते तरीपण अल्पवयीन मुलांकडून खोटी माहिती देऊन नोंद फोनवर केली जाते आहे. त्याकरिता पालकांच्या फोनचा वापर होत आहे. याअनुषंगाने ऑनलाईन गेम्स, चुकीचे चॅटींग आणि चुकीच्या ऍपवर चुकीचा व्हिडिओ बघून बालमनावर होणार्या दुष्परिणामावर आळा घालणेबाबत आणि पालकांना जाहीरपणे तंबी देणेबाबत.
5) बेकायदेशीर गुटखा व तंबाखूजन्य अंमली पदार्थांची राजरोसपणे शहरात विक्री केली जाते, यावर निर्बंध घालणेबाबत.
6) शहर परिसरातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळे येथे पोलिसांची गस्त वाढविणेबाबत.
या मागण्याचे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारामधील 16 शाळांच्यावतीने देण्यात आले. यावेळी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, हिंदवी पब्लिक स्कूलचे अमित कुलकर्णी, पेरेंटस असोसिएशन स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा टाकेकर, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज जाधव, शानबाग स्कूलचे प्रायमरी विभागाचे मुख्याधापक अभिजित मगर उपस्थित होते.
यावेळी चर्चेदरम्यान राजेंद्र चोरगे यांनी शाळांसमोरील आव्हाने, सोशल मिडियाचे अतिक्रमण, अवैध पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री यांचे भीषण वास्तव सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर मांडले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनीही आपण मांडलेल्या सूचनांचा आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करून त्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.
यावेळी गुरुकुल स्कूल सातारा, पोदार इंटरनॅशनल स्कूल, शाहू अकॅडमी, हिंदवी पब्लिक स्कूल, पेरेंटस असोसिएशन स्कूल, के एस डी शानबाग स्कूल, मोना स्कूल, निर्मल कॉन्हेंट स्कूल, सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल, रयत इंग्लिश स्कूल, दातार शेंदुरे स्कूल, जे डब्लू आयरन अकॅडमी, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, कन्या शाळा, अनंत इंग्लिश स्कूल, महाराजा सयाजीराव स्कूल, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय यासर्व शाळांचे सह्या असलेले निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.