सातारा : पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे.
गणेश देविदास पानसरे रा. बीड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलीस भरती सन 2021 च्या अनुषंगाने नोव्हेंबर 2022 पासून राबविण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराने समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर करून पोलीस प्रशासनाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्या अनुषंगाने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी गुन्ह्यातील बनावट प्रकल्पग्रस्त दाखले उमेदवारांना पुरवणाऱ्या आरोपींची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे गुन्ह्याचा तपास देऊन त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस अंमलदारांचे एक पथक तयार केले होते.
सुधीर पाटील यांच्या पथकाने पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करून प्रशासनाची फसवणूक करून फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात जाऊन शिताफीने अटक केले होते. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखला पुरवणारा हा बीड जिल्ह्यातला असल्याचे समजून आले. त्याने सातारा जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरती मध्ये देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुरवले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल होऊन महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील पोलीस पथके देखील त्याचा शोध घेत होती. त्यामुळे तो फरार झाला होता. तो त्याचा ठावठिकाणा कोणालाच समजून देत नव्हता. त्याच्यावर महाराष्ट्रातील सातारा, अलिबाग, पुणे, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी दहा गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या सुधीर पाटील आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने वेळोवेळी बीड-अहमदनगर जिल्ह्यात जाऊन वेशांतर करून तसेच तेथे गोपनीय बातमीदार नेमून, माहिती प्राप्त करून, त्यातून पुरावे गोळा करून उपलब्ध झालेल्या तांत्रिक माहितीच्या योग्य प्रकारे विश्लेषण करून सातारा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 2022-23 साली झालेल्या पोलीस भरती प्रक्रिये करिता उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरवणारा आरोपी शोधून काढून त्यास 16 डिसेंबर 2024 रोजी अटक केलेली आहे. त्याच्याकडे सखोल तपास केल्यानंतर हे बनावट दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे यांच्या मदतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणारा अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे याने पुरवले होते, असे त्याने सांगितले. हा अंशकालीन कर्मचारी 2021 मध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मयत झालेला असून त्याने तत्कालीन कालावधीत त्याला माहीत असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करून बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरवलेले होते, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने तपास पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित पारने पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार परितोष दातीर, पोलीस हवालदार सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, शरद बेबले, सनी आवटे, अमोल माने, अमित झेंडे, अजय जाधव, प्रवीण फडतरे, ओंकार यादव, वैभव सावंत, हसन तडवी, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, गणेश कापरे, मनोज जाधव, धीरज महाडिक, अमृत कर्पे, विजय निकम यांनी सहभाग घेतला.