सातारा : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या त्वरित आणि प्रभावी कार्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी श्री. पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून केलेल्या प्रयत्नांची विधानसभेत विशेष दखल घेण्यात आली.
या कौतुकामध्ये प्रामुख्याने शिवसेना आमदार विलास भुमरे, शिवसेना (उबाठा) आमदार सिद्धार्थ खरात, भाजप आमदार मोनिका राजळे, आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांचा सहभाग होता. या सर्व आमदारांनी एकाच सुरात मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
आमदार भुमरे यांनी सांगितले की, मंत्री मकरंद पाटील यांनी केवळ आश्वासने दिली नाहीत, तर अतिवृष्टीच्या काळात तातडीने कार्यवाही केली. तसेच, आमदार खरात (उबाठा) यांनी विरोधी पक्षात असूनही सरकारच्या या विधायक भूमिकेचे स्वागत केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीग्रस्तांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी श्री. पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला आहे.
आमदार मोनिका राजळे आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी विभागाच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले. या आमदारांनी नमूद केले की, मदत व पुनर्वसन विभागाने आणि शासनाने या काळात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केली. ही पद्धत अत्यंत दिलासादायक आणि शेतकरी-भिमुख होती. अनेकदा मदत मिळण्यास विलंब होतो, मात्र या अधिवेशनादरम्यान मंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ही मदत तात्काळ आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली.
या कौतुकाबद्दल मंत्री मकरंद पाटील यांनी सर्व आमदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, "शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढणे हे शासनाचे आणि माझ्या विभागाचे प्रथम कर्तव्य आहे. बांधावर जाऊन मदत करणे हा शेतकऱ्यांप्रति असलेल्या संवेदनशीलतेचा भाग आहे आणि यापुढेही माझा विभाग याच तत्परतेने काम करेल."
अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येत मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे कौतुक केल्याने, या विभागाचे काम किती प्रभावीपणे झाले हे स्पष्ट होते. या सकारात्मक वातावरणाने ना. मकरंद आबा सारखा एक संवेदनशील मंत्री मिळाल्याने महायुती सरकार ची प्रतिमा राज्यात उजळ झाल्याचे जाणवते.