नवी दिल्ली : अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या तरुणाचे नाव प्रवीण (२६) असे नाव आहे. तो विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे एमएस करत होता आणि एका दुकानात अर्धवेळ नोकरीही करत होता. ही घटना बुधवारी पहाटे घडली, त्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रवीणच्या कुटुंबाला कळवले.
तरुणाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना सकाळी ५ वाजता त्यांच्या मुलाचा व्हॉट्सअॅप कॉल आला, पण ते फोन उचलू शकले नाहीत. "उशिरा सकाळी मी मिस्ड कॉल पाहिला आणि त्याला व्हॉइस मेसेज पाठवला. पण, एक तास उलटूनही कॉल परत आला नाही. त्यानंतर मी त्याच्या नंबरवर कॉल केला, पण दुसऱ्याने कॉल उचलला. मला संशय आला आणि काहीतरी घडले असावे असे वाटून मी कॉल डिस्कनेक्ट केला."
"मी त्याच्या मित्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांना माहिती मिळाली होती की तो अर्धवेळ नोकरीसाठी एका दुकानात गेला होता आणि दरोडा टाकताना दरोडेखोरांनी गोळीबार केला. एक गोळी त्याला लागली आणि त्याचा यात मृत्यू झाला, असंही तरुणाचे वडिल म्हणाले.
प्रवीणचा चुलत भाऊ अरुण म्हणाला की, त्याच्या काही मित्रांनी प्रवीणचा मृतदेह मिळाल्याची माहिती दिली. काहींचे म्हणणे आहे की अज्ञात हल्लेखोरांनी एका दुकानात त्याची हत्या केली होती पण मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सांगितले.
प्रवीण याने हैदराबादमध्ये बीटेक पूर्ण केले होते, २०२३ मध्ये तो एमएससाठी अमेरिकेला गेला होता. तो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात आला आणि जानेवारी २०२५ मध्ये अमेरिकेला परतला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबात शोककळा पसरली. प्रवीणने घटनेच्या काही तास आधी त्याच्या वडिलांना फोन केला होता, पण ते झोपले होते त्यामुळे संभाषण होऊ शकले नाही.