आ. मनोज घोरपडे यांची आर्याच्या कुटूंबास भेट; आर्याला न्याय मिळण्यासाठी सासपडे गावात कँडल मार्च

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा :  सासपडे (ता.सातारा) येथील आर्या चव्हाण या अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या घटनेनंतर निरागस आर्याला न्याय मिळावा, नराधम संशयित खुनी राहुल यास कडक शासन व्हावे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ११ रोजी सासपडे गावात रात्री आठ वाजता कँडल मार्च काढण्यात आला. तर रविवारी मृत आर्याच्या कुटूंबावर कोसळलेला प्रसंग पाहता कराड उत्तरचे आ. मनोज घोरपडे यांनी कुटूंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.

यावेळी आ. मनोज घोरपडे यांनी कुटूंबियांचे म्हणणे ऐकून घेतले व तेथूनच पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केला. जवळपास वीस मिनिटे झालेल्या संवादामध्ये सासपडे येथीलच दुसऱ्या मुलीच्या अपहरण व मृत्यू प्रकरणावर चर्चा केली. त्या प्रकरणात पोलीस तपासात झालेली हयगय व संशयिताचे नाव सांगुनही गुन्हा उघडकीस न आल्याबद्धल बोरगाव पोलिस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी यांच्याबद्धल ग्रामस्थांच्या असलेल्या तीव्र भावना मांडल्या. स्वतः आ. मनोज घोरपडे यांनी केलेला पाठपुरावा याची माहिती देऊन त्या अधिकाऱ्याबद्धल प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच पिडीत चव्हाण कुटूंबास न्याय मिळून ,आरोपीस शिक्षा मिळेपर्यंत लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

परिपूर्ण तपासासाठी सहकार्य मिळावे

मृत आर्या चव्हाण हिच्या खुन प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत. घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. संशयिताने पाठीमागील वेळी केलेले कृत्य उघडकीस आले नाही म्हणुन आर्याचा बळी गेला असा आरोप केला आहे. त्यादृष्टीनेही आम्ही तपास करत आहोत. मृत आर्याच्या खुन प्रकरणात सर्व महत्वाचे दुवे जोडून नराधम संशयितास कडक शासन मिळावे यासाठी परिपूर्ण तपास होणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने आमचा तपास प्रगती पथावर आहे. आता ग्रामस्थांचे सहकार्यही अपेक्षीत आहे.

संदीप वाळवेकर, सपोनि, बोरगाव पोलीस ठाणे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बहारदार कलाविष्काराने औंध संगीत महोत्सवाची सांगता; हजारो रसिकांची उपस्थिती; विद्वत्तापूर्ण गायकीला दाद
पुढील बातमी
स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्यात उसाला उच्चांकी दर मिळवून देणार; राजू शेट्टी

संबंधित बातम्या