कोरेगाव : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी पार पडली. सकाळी ११ वाजल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या दालनात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली.
छाननीदरम्यान जिल्हा परिषदेच्या चार तर पंचायत समितीच्या सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ४९ तर पंचायत समितीसाठी ८७ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तालुक्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार उभे केले असून दोन खासदार व चार आमदारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत पिंपोडे बुद्रुक येथील गणेश वीरसेन पवार यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला. वाठार स्टेशन गटातील शुभांगी उमेश देशमुख यांनी जातीचा दाखला जोडलेला नव्हता. सातारारोड गटातील ज्योती दीपक फाळके यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते, तर कुमठे गटातील समाधान जगन्नाथ गडगे यांच्या अर्जावर उमेदवार व सूचक यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला.
पंचायत समिती निवडणुकीत सोनके गणातील राहुल बाबासो धुमाळ यांच्या अर्जासोबत अपूर्ण प्रतिज्ञापत्र जोडले होते. वाठार स्टेशन गणातील शुभांगी त्रिंबक जाधव यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नव्हती. सातारारोड गणातील महेंद्र भिवाजी मोरे यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याचे आढळून आले. सरोज नामदेव गंगावणे यांच्या अर्जावर उमेदवाराची स्वतःची स्वाक्षरी नव्हती. किन्हई गणातील सुनिता चरण मोहिते यांचे प्रतिज्ञापत्र नोटरी न केल्याने अर्ज बाद ठरला. आर्वी गणातील सुनील जिजाबा भोसले यांचे प्रतिज्ञापत्र अपूर्ण होते, तर वाठार किरोली गणातील मनीषा विनायक जंगम यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला.
या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कुदळे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, सुनीता धिमते, सहाय्यक महसूल अधिकारी नितीन देशमुख व महसूल सहाय्यक रवींद्र किरवे यांनी सहाय्य केले.