एकाही झाडाला हात लावू नका : मकरंद पाटील

सुरूर- वाई, मांढरदेव रस्त्याच्या कामाचा आढावा

by Team Satara Today | published on : 28 May 2025


वाई : सुरूर-शहाबाग (वाई) रस्त्यालगत असलेली दीडशे वर्षांपूर्वीपासूनची झाडे वाईचे सौंदर्य आणि वैभव आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात एकाही झाडाला हात लावू नये. झाडे भराव करून सुरक्षित करावीत. स्थानिक व पर्यटकांच्या वाहनांना अडथळा होणार नाही, असे नियोजन करून टप्प्याटप्प्याने मॉन्सूनपूर्वी भराव व काँक्रिटीकरण पूर्ण करावे. यामध्ये ठेकेदार अथवा अधिकारी यांच्याकडून हलगर्जीपणा झाल्यास कोणाचीही गाय केली जाणार नाही, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्यामार्फत पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, सुरूर, भाडळे, दहिवडी या राज्य महामार्गावर सुरूर ते कुंभरोशी तसेच पारगाव यवत, कापूरहोळ, भोर, मांढरदेव, वाई, शहाबाग, सुरूर या दोन रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये रस्त्यालगतची झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे, तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहतुकीची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची आढावा बैठक घेतली.

यावेळी पाटील यांनी या रस्त्यावरील वाहतुकीसाठी पर्यायी उपाययोजना न करता एकाच वेळी सर्वच रस्त्याची खोदाई केल्याबद्दल नाराजी व्यक्त करून ठेकेदार व अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला सुरूरच्या बाजूने येणारी सर्व वाहतूक जोशीविहीर व पाचवडमार्गे, तर महाबळेश्वर बाजूने येणारी वाहतूक सुरूरमार्गे अशी एकेरी सुरू केली होती. मात्र, पर्यटन महोत्सवामुळे त्यामध्ये बदल करावा लागला.

त्यावर मंत्री पाटील यांनी आता पुन्हा एकेरी वाहतूक सुरू करून त्याठिकाणी वाहतुकीतील बदलाचे फलक लावावेत, तसेच पाचवड, जोशीविहीर, ओझर्डे, कवठे, बोपेगाव, खानापूर या रस्त्यावर आवश्यक तेथे गतिरोधक करून त्याचे फलक लावावेत. वाई औद्योगिक वसाहत तसेच शहाबाग- वाई रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटारे पक्की व योग्य पद्धतीने करावीत, शहरातील चौपदरीकरणाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण होईल, असे नियोजन करावे, कामाची गुणवत्ता तसेच विनाकारण तक्रारी वाढणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी राज्य पायभूत सुविधा विकास मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. वनगोसावी, कार्यकारी अभियंतानायकवडी, प्रकल्प व्यवस्थापक समीर रहाटे, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण विभाग) पुण्याच्या कार्यकारी अभियंता श्रीमती भंडारे, उपअभियंता आगळे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता महेश गोंजारी, तहसीलदार सोनाली मेटकरी, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, नायब तहसीलदार वैभव पवार, भाऊसाहेब जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी, पर्यावरणप्रेमी प्रशांत डोंगरे, भाऊ मेहता, फुलेनगर व शहाबाग ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या सात मीटर रुंदीचा रस्ता असून, प्रस्तावित कामात १० मीटर रुंद आहे. झाडे वाचविण्यासाठी काही ठिकाणी सात, काही ठिकाणी आठ मीटर, तर काही ठिकाणी दहा मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे. सध्याचे सुरू असलेले काम जुलैअखेर पूर्ण होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोकणातील गाबीत समाजासाठी शिबिराचे आयोजन करावे : मंत्री अतुल सावे
पुढील बातमी
पाणीपुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर भेटी देण्याचे निर्देश : मंत्री गुलाबराव पाटील

संबंधित बातम्या