सातारा, दि. 10 : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीपासून देश मुक्त करण्यासाठी सातार्याच्या प्रतिसरकारमधील क्रांतिवीरांनी मोठे योगदान दिले. त्या सर्वांचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या, स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले.
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी 10 सप्टेंबर 1944 मध्ये सातारचा तुरुंग फोडला. या घटनेला 81 वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त जिल्हा मध्यवर्ती कारागृहाबाहेरील स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर वैभव नायकवडी बोलत होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, कारागृह अधीक्षक रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, हुतात्मा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, शिक्षक, प्राध्यापक, हुतात्मा संकुलातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्रयत्न केले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाचा नव्या पिढीला अभिमान आहे. 10 सप्टेंबर हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. हा इतिहास नव्या पिढ्यांना कळावा म्हणून, शौर्य दिन साजरा केला पाहिजे. या दिवसापासून प्रेरणा घेतली पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रतिसरकार स्थापन झाले. त्यामध्ये नागनाथअण्णांची भूमिका महत्त्वाची होती. तब्बल 640 गावांमध्ये प्रतिसरकार होते. इंग्रज सरकारपुढे ते झुकले नाही. नागनाथअण्णांची ही चळवळ, जेल फोडो ही घटना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे. या घटनेतून प्रेरणा घेत, देश एकसंध ठेवला पाहिजे. देशविघातक शक्ती, दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी एक राहिले पाहिजे. क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे.
रमाकांत शेडगे म्हणाले, डॉ. नागनाथअण्णांचे शौर्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांच्या शौर्यातून प्रेरणा मिळते. आता देश पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी तरुण पिढीवरच आहे.
यावेळी प्रतिसरकार स्मारक समितीचे प्रा. विजय निकम, अस्लम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील, राजाराम शिंदे, अजित वाजे, तुकाराम डवंग, नारायण कारंडे, जयकर चव्हाण, बाळासाहेब नायकवडी, विश्वंभर बाबर, छत्रपती शिवाजी कॉलेज व कला वाणिज्य कॉलेजचे प्राध्यापक, विविध चळवळींमधील कार्यकर्ते उपस्थित होते.