सातारा : भारतीय संविधान केवळ पुस्तक नाही, तर सर्व स्तरातल्या नागरिकांच्या सर्वप्रकारच्या न्यायहक्काचा जाहीरनामा असून संविधानाकडे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून पाहिले जाते. संविधान हातात घेतल्यानंतर त्यामध्ये असणार्या एकाच वाक्यातील उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाची ओळख त्याचे महत्त्व जगाला झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळेच संविधानाची उद्देशिका ही आपल्या भारताची कोनशिला आहे, असे मत डॉ, बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त संविधान जागर अभियान आणि महिला मेळाव्याचे आयोजन समाजिक न्यायभवनात करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. यावेळी मुकुंद गोरे, पंचशिला खंडाईत, राजू आढाव, धनश्री निबांळकर, वसुंधरा शिंदे, महादेवी बारस्कर, दिलीप वसावे आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण जावळे यांनी भारतीय संविधान भारताचा श्वास कसा आहे, संविधानाच्या प्रस्तावनेतील प्रत्येक शब्दाची ताकद काय आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले. ’आम्ही भारताचे लोक यापासून ते अधिनियमीत करून स्वःप्रत अर्पण करत आहे’ इथपर्यतच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अत्यंत साध्यासोप्या पद्धतीने उलगडून स्पष्ट केला. समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याबाबतची संविधानाची संकल्पना काय हेही विस्ताराने सांगितले. संविधान केवळ अभ्यासाचा किंवा पाठांतराचा विषय नसून तो जगण्याचा विषय आहे, असेही जावळे यांनी नमूद केले.
दरम्यान पहिल्या सत्रात दीपिका सूर्यवंशी यांनी महिलांच्या प्रश्नावर सविस्तर विवेचन केले. महिलांना येणार्या अडचणी तसेच महिलांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. प्रणाली संतोष सोनवणे व परिणिता सरदार खोत यांनी महिलांचे जीवन कार्य आणि मी सावित्रीबाई फुले बोलते एकपात्री नाटिका सादर करून उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.
समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार संविधान जागर अभियान व त्याअंतर्गत विविध उपक्रम पार पडले. या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागाबरोबरच बार्टीचे अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या सदस्य महिला, विद्यार्थी व जिल्ह्यातील समतादूत बहुसंख्येने उपस्थित होते. समतादूत विशाल कांबळे यांनी अत्यंत उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.