सातारा : आयुष विभागाअंतर्गत स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिन अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव डॉ. अरुंधती कदम, डॉ. उल्का झेंडे, व्यंकटेश गौर यांच्यासह विविध विभागांचे वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, तसेच आयुष विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व युनानी चिकित्सा पद्धतीचे प्रणेते हकीम अजमल खान यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ फेब्रुवारी हा दिवस जागतिक युनानी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी युनानी व आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या प्रसार प्रचारासाठी मोलाचे योगदान दिले. भारतातील युनानी वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या उभारणीत त्यांची भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. करपे म्हणाले, आयुर्वेद, होमिओपॅथी, योग व युनानी या प्राचीन उपचार पद्धती आजच्या आधुनिक काळातही तितक्याच परिणामकारक व वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे.अधिकाधिक नागरिकांनी आयुष चिकित्सा पद्धतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच लवकरच ५० खाटांचे आयुष रुग्णालय कार्यान्वित होणार असून त्याद्वारे सर्वसामान्यांना समग्र व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा उपलब्ध होणार असल्याची डॉ. करपे यांनी सांगितले. युनानी तज्ञांनी त्वचारोग, मूत्रविकार, पचनसंस्था विकार आदी आजारांवर युनानी उपचारपद्धती प्रभावीपणे राबविली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संजीवनी शिंदे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. मिथुन पवार यांनी केले.