कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा शनिवारपासून तृतीय युवा महोत्सव; अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते होणार उदघाटन

by Team Satara Today | published on : 10 October 2025


सातारा : साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा तृतीय युवा महोत्सव दि.  ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे उत्साहात पार पडणार आहे. या भव्य युवा सोहळ्याचे आयोजन विद्यापीठाचे कुलाधिकारी  चंद्रकांत दळवी व कुलगुरू  डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या युवा महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते होणार आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली असून त्यांनी जाऊ तिथे खाऊ, अण्णा हजारे, एक गाव दहावी नापास, आंबट, देव अवतारी बाळू मामा, एक अलबेला, विघ्नहर्ता महागणपती, मळगंगादेवी, बरड, मला एक चान्स हवा, मैत्री आदी चित्रपटांत प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.

उदघाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के उपस्थित राहणार असून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, सचिव मा. श्री. विकास देशमुख, ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय कुंभार, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव तसेच ‘आप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते संतोष पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि माध्यमिक विभागाचे सहसचिव  बी. एन. पवार साहेब उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व अधिष्ठाता, विविध मंडळांचे संचालक, तीनही घटक महाविद्यालयांचे उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

युवा महोत्सवात विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयांपैकी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, छत्रपती शिवाजी कॉलेज, आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थी विविध सांस्कृतिक कलाप्रकार सादर करणार आहेत.सांघिक स्पर्धांमध्ये लोकनृत्य, लघुनाटिका, मूकनाट्य, भारतीय समूहगीत, लोकवाद्यवृंद तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये नकला, वक्तृत्व, शास्त्रीय गायन, पाश्चिमात्य एकलगायन, स्थळचित्र, व्यंगचित्र, भित्तिचित्र निर्मिती, कातरकाम, स्थळ छायाचित्रण, मातीकाम, लावणी अशा कलाप्रकारांचा समावेश आहे.


या कार्यक्रमाबाबतची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. रामराजे माने-देशमुख आणि युवा महोत्सव समितीच्या चेअरमन प्रो. डॉ. विद्या पाटील यांनी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मंच मिळणार असून विद्यापीठ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; विभाग नियंत्रक विकास माने यांना मागण्यांचे निवेदन
पुढील बातमी
'अंनिस'चे दिवाळीला 'फटाके नको, पुस्तके घ्या' अभियान; ना नफा-ना तोटा तत्त्वावर पुस्तकांची होणार विक्री

संबंधित बातम्या