सातारा : भांबवली परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या भांबवली वजराई धबधब्याने पुन्हा एकदा रौद्र आणि मनमोहक रूप धारण केले आहे. धबधबा ओसंडून वाहू लागल्याने यंदाच्या पर्यटन हंगामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
भांबवली पर्यटन प्रमुख रविंद्र बळीराम मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून पर्यटन हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मोरे, दिलीप मोरे, हणुमंत मोरे, विठ्ठल माने, तानाजी जाधव, लक्ष्मण सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मिरमधून आलेल्या पर्यटकांनी पहिले तिकीट घेऊन यंदाच्या पर्यटन हंगामाची औपचारिक सुरुवात केली.
धबधब्याकडे जाण्यासाठी पर्यटकांना घनदाट जंगलातून सुमारे दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. या ट्रेकिंगदरम्यान पावसाची रिपरिप, हवेतला गारवा, ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा मंजुळ नाद आणि पानांचा सळसळाट यामुळे पर्यटकांना निसर्गाची अनोखी संगीत मैफल अनुभवायला मिळते. धबधब्याचा प्रचंड जलप्रपात आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात.
थंडगार आणि आल्हाददायक वातावरण, हिरवाईने नटलेले डोंगर आणि धबधब्याचे विहंगम दृश्य मनाला वेगळाच आनंद देत असल्याचे पर्यटक सांगत आहेत. दोन किलोमीटरचा पायी प्रवासही निसर्गसौंदर्यामुळे थकवा जाणवू देत नाही. यावर्षी मार्गातील दोन ओढ्यांवर उभारण्यात आलेले छोटेखानी पूल पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत असून, अनेक पर्यटक तेथे आवर्जून छायाचित्रे आणि सेल्फी काढताना दिसत आहेत.