कराड : कराड शहर पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या संशयित आरोपीच्या पत्नीने लॉकअपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत महिला पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सोनाली प्रताप पिसाळ दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्या गुन्हे प्रकटीकरण शाखेत कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या संशयित आरोपीला पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात येऊन “माझ्या नवऱ्याला आत्ताच सोडा” असा आरडाओरडा करीत लॉकअपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला.
पहाऱ्यावर असलेले पो.कॉ. दडस व इतर कर्मचारी यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती ऐकण्यास तयार नव्हती. या गोंधळात संबंधित महिलेने महिला पोलीस सोनाली पिसाळ यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तिच्या नखांनी पिसाळ यांच्या चेहऱ्यावर व डोळ्याजवळ ओरखडे काढून दुखापत केली. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन शांत केले. जखमी पिसाळ यांच्यावर कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.