सातारा : सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅन कार्ड लिंक असल्याची खात्री तातडीने करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे.
केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित निवृत्तीवेतनधारकांना वाढीव दराने आयकर कपातीचा सामना करावा लागू शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनासह इतर राज्ये आणि केंद्र शासनाचे निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक सातारा जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत आपले निवृत्तीवेतन प्राप्त करतात. या सर्व लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड आणि पॅन कार्डशी लिंक केले आहे की नाही, याची संबंधित बँकेत जाऊन खात्री करणे अनिवार्य आहे.
निवृत्तीवेतनधारकांचे पेन्शन खाते आधार आणि पॅन कार्डशी लिंक नसेल आणि त्यांचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत असेल, तर त्यांच्यावर आयकर अधिनियमातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार वाढीव दराने आयकराची कपात करण्यात येणार आहे. "निवृत्तीवेतनधारकांनी होणारी आर्थिक ओढताण आणि वाढीव आयकर कपात टाळण्यासाठी आपले बँक पेन्शन खाते आधार व पॅन कार्डशी लिंक करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी," असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
त्यासाठी आपल्या बँकेच्या शाखेला भेट देऊन 'KYC' स्टेटस तपासा. पॅन आणि आधार लिंक असल्याची खात्री करा. तांत्रिक त्रुटी असल्यास बँकेकडून त्या त्वरित दुरुस्त करून घ्या.