वेळे, ता. वाई येथे दरोड्याच्या तयारीत असलेले चार जण जेरबंद; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त, भुईंज पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 25 February 2026


सातारा  : वेळे, ता. वाई येथे खंबाटकी घाटालगत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अमित बजरंग चव्हाण (वय 28, मूळ रा. कुडाळ, ता. जावळी, सध्या रा. खेड शिवापूर, ता, हवेली, जि. पुणे), सुफियाज मुस्ताफ मुजाहिद (वय 30, रा. खेड शिवापूर), सूरज महादेव जाधव (वय 19, रा. शिवाजीनगर, खेड शिवापूर) या सराईत गुन्हेगारांना भुईंज पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वेळे गावच्या हद्दीत करुणा मंदिराच्या समोरील बाजूस मारुती ईर्टिगा कार महामार्गालगत लावून शेजारी असलेल्या झुडपांमध्ये पाच दरोडेखोर लपले आहेत. ते पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि पृथ्वीराज ताटे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, वाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार शिंदे, हवालदार कदम, पोलीस कॉन्स्टेबल सपकाळ आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी साध्या वेशात, त्या ठिकाणी सापळा लावून, बुधवारी पहाटे 3.15 च्या सुमारास चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन, पळून गेला.

पोलिसांनी दरोडेखोरांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन कोयते, एक कटावणी, मिरची पूड, तीन मोबाइल आढळले. त्यांच्याकडून कारसह दहा लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी संशयिताचा कसून शोध घेतला जात आहे.

सपोनि पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सूरज शिंदे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, अंमलदार सुशांत धुमाळ, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सकपाळ, अभिजित वाघमळे यांनी ही कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी भारतीय मजदूर संघाचे धरणे; राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
पुढील बातमी
पाचगणीत ईडीची धडक कारवाई; ‘बरुचा बंगला’ शासनाच्या ताब्यात; परिसरात मोठी खळबळ

संबंधित बातम्या