पुणे : पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, सात सिम बॉक्स, वायफाय आणि सिम्बॉक्स चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे.
पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वीच उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले होते. पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्याची गोपणीय माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
पुण्यातील कोंढवा भाग संवेदनशील आहे. या ठिकाणी अनेक दिवस अतिरेकी राहत होते. सीमी या दहशतवादी संघटनेशी संबंधित अतिरेकी राहत असताना तपास यंत्रणांना त्याची माहिती मिळाली नाही. अखेर पुणे पोलिसांनी एका मोटारसायकल चोरी प्रकरणात आरोपी मिळाले. त्या आरोपींची चौकशी केल्यावर ते दहशतवादी निघाले. आता नौशाद अहमद सिद्धी याचा त्या दहशतवाद्यांशी संबंध आहे का? या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे.