सातारा : श्री शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त सातार्यात दि. 18 व 19 मे रोजी गुरुवर्य चषक राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव माने यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीमंत छ. उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित राहणार आहेत, असे मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी सांगितले.
गोपाळराव माने म्हणाले, शिवाजी उदय मंडळाचे संस्थापक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, क्रीडा महर्षी, गुरूवर्य ल. स. तथा बबनराव उथळे यांच्या 99 व्या जयंती निमित्त गुरूवर्य चषक भव्य राज्यस्तरीय पुरूष निमंत्रीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील 12 नामवंत संघाचा सहभाग आहे. गुरूवर्य बबनराव उथळे यांनी आपले आयुष्य क्रीडा सेवेसाठी समर्पित केले होते. 80 वर्षांची क्रीडा व सांस्कृतिक परंपरा असलेल्या श्री शिवाजी उदय मंडळाच्या माध्यमातून गुरूवर्य आण्णांनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. मंडळाने आजवर आण्णांच्या मार्गदर्शनाखाली 7 खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत. राष्ट्रपती पुरस्कार 2, जिल्हा क्रीडा पुरस्कार 3, आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2 मिळविले आहेत. संस्थेच्या जिल्ह्यात शिवथर, वळसे तर पुणे जिल्ह्यात चिंचवड आणि लोणावळा या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत. आण्णांनी सुरू केलेले हे कार्य अविरत सुरु राहील या दृष्टीकोनातून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी एकूण सव्वा लाखाची बक्षिसे रोख रक्कम स्वरूपात विजेत्या संघांना चषक व उत्कृष्ठ खेळाडूंना देण्यात येणार आहेत. यामध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि प्रो कबड्डी मध्ये सहभाग असणार्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची पर्वणी सातारकर क्रीडा रसिकांना मिळणार आहे.
या गुरूवर्य चषक स्पर्धेचे उद्घाटन रविवार, दि.18 रोजी सायंकाळी 7 वा. मंडळाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा लाभ सातारा शहरातील क्रीडा रसिकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे सचिव शिवप्रसाद उथळे यांनी केले आहे. एस. एम. पटेल नांदेड, इच्छाशक्ति क्रीडा मंडळ पालघर, सतेज संघ बाणेर, अंबिका सेवा मंडळ मुंबई उपनगर, जयंत स्पोटर्स क्लब इस्लामपूर, आझाद टाकळीभाण अहिल्यानगर, स्वस्तिक संघ मुंबई उपनगर, भैरवनाथ भोसरी पुणे, शिवमुद्रा कौलव कोल्हापूर, न्यु हिंद विजयी चिपळूण, मावळी क्रीडा मंडळ ठाणे, साई सेवा मंडळ छत्रपती संभाजी नगर आदी संघांनी सहभाग घेतला आहे. त्यातील निलेश काळ भेरे, विराज लांडगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता तेजस पाटील, किरण मगर, शैलेश गराळे, अक्रम शेख, अक्षय भरडे, शुभम पाटील, महादेव उगार, विश्वजीत घाडगे, ओम शिर्के, अमरसिंग कक्षप, यश निंबाळकर, कृष्णा पवार, राहुल डेके, साहिल पाटील, राज जयस्वाल, सुमित कदम, धीरज बैलमारे, वैभव मोरे, अल्केश चव्हाण यांचा सहभाग आहे.