सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रा. सचिन सानप यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारा आणि त्यांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष संघर्ष करणारा शिक्षकच शिक्षकांचा आमदार असावा, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
प्रा. सानप म्हणाले, 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विनाअनुदानित तसेच अंशतः अनुदानित तत्त्वावर सेवेत आलेल्या शिक्षकांनाही जुन्या पेन्शनचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच आवश्यकता भासल्यास न्यायालयीन लढा देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना अनुदानाच्या टप्प्यांची प्रतीक्षा न करता कालबद्ध पद्धतीने पूर्ण अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना आर्थिक स्थैर्य आणि सेवा सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समान काम, समान सेवा, न्याय्य वेतन व लाभ’ या भूमिकेतून तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी आणि कौशल्य शिक्षण क्षेत्रातील पात्र शिक्षकांच्या सेवा व आर्थिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सानप यांनी सांगितले.
शिक्षकांना निवडणूक, जनगणना, विविध सर्वेक्षणांसह अन्य अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त केले जाते. त्यामुळे अध्यापनाच्या मूळ कार्यावर परिणाम होत असल्याचे सांगत, शिक्षकांची अशा कामांतून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गरज पडल्यास न्यायालयीन लढा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात यावे, यासाठीही आपण आग्रही राहणार असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या शिक्षकांनाच राजकीय पक्षांनी शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, तसेच शिक्षक मतदारांनीही उमेदवारांच्या प्रश्नांवरील भूमिकेचा विचार करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा; शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. सचिन सानप यांची भूमिका
जुनी पेन्शन, पूर्ण अनुदान, अशैक्षणिक कामांतून मुक्तता आणि निवृत्तीचे वय 60 करण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा