फलटण : फलटणच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून धगधगणाऱ्या संघर्षाचा अखेर अत्यंत नाट्यमय शेवट झाला असून, फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत अनपेक्षित युतीचे दर्शन घडले आहे. प्रचंड राजकीय पेचप्रसंगानंतर अखेर राष्ट्रवादीच्या शिवांजली विक्रमसिंह भोसले यांची भाजपच्या पाठिंब्यावर सभापतीपदी, तर शिवसेनेच्या (राजे गट) अमोल सस्ते यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या संपूर्ण प्रक्रियेत पडद्यामागे घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे फलटणमधील 'सेटलमेंट'चे राजकारण आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
कट्टर विरोधक दोन्ही गट एकत्र
निवडीनंतर राजकीय श्रेयवादाची मोठी लढाई पाहायला मिळाली. शिवांजली भोसले या राष्ट्रवादीच्या 'एबी' फॉर्मवर निवडून आल्या असल्याचा दावा खासदार नितीन पाटील यांनी केला असला, तरी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना भाजपच्या सभापती संबोधून नवा ट्विस्ट दिला आहे. विशेष म्हणजे, निवडीचा सोहळा पार पडताच शिवांजली यांचे वडील विक्रमसिंह भोसले यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. दुसरीकडे, ईश्वर चिठ्ठीवर सभापतीपद मिळण्याची संधी असतानाही रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाने केवळ उपसभापतीपदावर समाधान मानले. यामागे सव्वा-सव्वा वर्षांचा 'फॉर्म्युला' असल्याचे सांगितले जात असले तरी, कट्टर विरोधक असलेल्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यात मंत्री मकरंद पाटील आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मध्यस्थी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.
एकाच व्यासपीठावर जमले सर्व दिग्गज
सोमवारी सकाळपासूनच फलटणमध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. पाटील बंधूंनी या निवडीमध्ये स्वतः लक्ष घालून भाजपच्या नेत्यांना संजीवराजेंच्या भेटीसाठी धाडले आणि त्यानंतरच बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. विजयानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपकराव चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करण्यासाठी हजेरी लावली होती. एकाच व्यासपीठावर जमलेले हे सर्व दिग्गज फलटणच्या राजकारणाची नवी समीकरणे अधोरेखित करत असून, या 'सेटलमेंट'मुळे आगामी निवडणुकांमध्ये कोणाचे पारडे जड राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.