सातारा : सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सातारा शहराच्या लगत असणाऱ्या चार भिंतींकडून डोंगर मार्गाने कास पठार परिसर आणि थेट मोळाचा ओढा यांना जोडणाऱ्या पहिल्या रिंग रोडचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सातारा पालिकेने याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार करून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य शासनाच्या सादर झालेल्या अंदाजपत्रकाच्या संदर्भात पत्रकारांशी वार्तालाप करताना शिवेंद्रसिंह राजे यांनी सातारा शहराच्या स्थानिक मुद्द्यान संदर्भात अनेक संदर्भाने महत्त्वपूर्ण माहिती दिली .यावेळी भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम प्रदेश समितीचे सरचिटणीस विक्रम पावसकर जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार व विकास गोसावी यावेळी उपस्थित होते .
शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले पुढे म्हणाले, सातारा शहराच्या वाहतुकीची कोंडी वाढती लोकसंख्या अपुरे रस्ते या संदर्भाने ही कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचा प्रस्ताव देण्यात आला होता. हा रोड सातारा शहर परिसरातील उंटाचा डोंगर अजिंक्यतारा किल्ला चार भिंती तिथून बोगदा यवतेश्वरच्या घाट परिसराकडून थेट भैरोबाच्या पायथ्याला वळसा घालून मेढा मार्ग खिंड तसेच मोळाचा ओढा यांना जोडणाऱ्या पहिल्या रिंग रोड प्रस्तावाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. याचे काम एका खाजगी एजन्सीला देण्यात आले होते. हा रस्ता संपूर्णपणे डिव्हायडर फुटपाथ तसेच दोन वाहने प्रशस्तपणे जाऊ शकतील इतकी रुंदी अशा पद्धतीने संरचित करण्यात आला आहे. यामध्ये जागा हस्तांतरण प्रक्रिया करता 20 कोटी रुपयांची तरतूद आणि प्रत्यक्ष कामासाठी रस्ते विकसन पायाभूत सुविधा याकरता 100 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे .सातारा पालिकेने हद्दीतील संपूर्ण जागा प्रत्यक्ष कामासाठी हस्तांतरित करण्याची तयारी ठेवली आहे .प्रत्यक्ष मंजुरीच्या वेळी भूमापन केल्यानंतर या बजेटची प्रत्यक्ष किंमत निश्चित केली जाईल. या पद्धतीने सातारा शहर परिसराचा वाहतुकीचा 40% ताण या रिंग रोडच्या माध्यमातून सोडवला जाणार आहे.
सातारा शहरातील राजपथ व राधिका रोड हे दोन रस्ते संपूर्णपणे काँक्रीट करण्यात येणार असून या रस्त्यालगतच्या बाजूने संपूर्ण पाईपलाईनचे काम केले जाणार आहे. पोवई नाका ते कूपर बंगला यादरम्यान जो सिमेंटचा रस्ता करण्यात आला होता त्या पद्धतीने हे दोन्ही रस्ते तयार करण्यात येणार असून यामध्ये प्रशस्त फूटपाथ तसेच रोड लेवल पाहून बांधला जाणार आहे .या दोन्ही रस्त्यांसाठी साधारण 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सातारा शहरातील कचऱ्याचे निर्मूलन करणाऱ्या सोनगाव कचरा डेपोच्या संदर्भात शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले संबंधित ठेकेदाराला कचऱ्याचे निर्मूलन करणे अथवा ठेकेदार बदलणे अशा सूचना देण्यात आले आहेत तसेच भविष्य काळामध्ये अशा दुर्घटना होऊ नये याकरिता तेथे अद्ययावत जलयंत्रणा उभी करणे व पाच लाख लिटर ची पाण्याची टाकी बांधून त्यामध्ये पाणी भरून ठेवणे अशा सोयी करण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आले आहेत .आग आटोक्यात आणण्यासंदर्भात संबंधित आरोग्य यंत्रणेला अपयश येत असल्याने याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करणे बाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.