आरोग्यदायी जीवनासाठी कचरा वर्गीकरण करा

राजेश भोसले यांच्या आवाहनानंतर मसूरच्या महिलांनी घेतला निर्णय

by Team Satara Today | published on : 17 July 2025


सातारा : पाणी, हवा, माती, अन्न प्रदूषणाला आळा घालून आरोग्यदायी पर्यावरण करावयाचे असेल तर घनकचरा व्यवस्थापन कुटुंब पातळीपासून सुरू करावे. प्रत्येक घरी ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी दोन डस्टबिन ठेवावेत. प्रत्येक कुटुंबाने ओला कचरा दररोज घंटागाडीमध्ये टाकावा व सुका कचर्‍यासाठी आठवड्यातून दर रविवारी स्वतंत्र घंटागाडी येईल, त्यामध्ये सुका कचरा टाकावा असे आवाहन स्वच्छ भारत मिशन जिल्हा तज्ञ राजेश भोसले यांनी करताच मसूरच्या महिलांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत कचरा वर्गीकरणाचा निर्णय घेतला.

मसूर ता. कराड येथील जिजाऊ व वटवृक्ष महिला बचत गट ग्राम संघाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी प्रभाग संघाच्या अध्यक्ष गीतांजली इंगवले, उषा जगदाळे, गट समन्वयक पूनम पाटील, तालुका व्यवस्थापक नीता येडगे, प्रभाग समन्वयक उस्मान मुलांनी ग्रामपंचायत अधिकारी बी. डी. मेडेवाड, सीआरपी रूपाली भांडवले, साक्षी फडतरे उपस्थित होते.

राजेश भोसले म्हणाले, कचरा वर्गीकरणामुळे ग्रामपंचायतीला घनकचरा व्यवस्थापन करणे सोपे होऊन ओल्या कचर्‍यापासून खत निर्मिती व सुका कचरा पुनर्चक्रीकरणासाठी देता येईल. कचर्‍यामधून ग्रामपंचायतला उत्पन्नाचे साधन निर्माण होईल. मसूरच्या महिलांनी कचरा वर्गीकरणाचा केलेला संकल्प कराड तालुक्यातील इतर गावांना कचरा वर्गीकरणासाठी चालना देईल.

यावेळी गट संसाधन केंद्राचे पूनम पाटील यांनी ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून दिले. प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी बी. डी. मेडेवाड यांनी केले. यावेळी मसूर मधील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे शनिवारी सातारा जिल्ह्यात होणार जंगी स्वागत
पुढील बातमी
कंत्राटी कामगारांचे खा.उदयनराजेंना साकडे

संबंधित बातम्या