सूर्यनारायणाच्या साक्षीने मराठी नवीन वर्षाचे 'असेही' स्वागत!

by Team Satara Today | published on : 30 March 2025


सातारा : शाहूपुरी- मेढा रस्त्यावर, कोंडवे खिंडीतील झाडांना पाणी देत आज सातारकरांनी मराठी नूतन वर्षाचे स्वागत सूर्यनारायणाच्या साक्षीने श्रमदान करून केले. यावेळी नागरिकांनी पायथ्याच्या तलावातून पाणी शेंदून टेकडीवरील सुमारे 100 झाडांना जीवनदान दिले.

हरित सातारा ग्रुपने गेल्या वर्षी टेकड्यांवर वृक्षारोपण व संवर्धनाचा कार्यक्रम लोकसहभागातून हाती घेतला आहे. मंगळाई टेकडीवर हरित साताराचे कार्यकर्ते व काही सातारकर नागरिक नित्यनियमाने टेकडीवरील झाडांना पाणी देऊन त्यांचे संवर्धन करत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून शाहूपुरी ते मेढा रस्त्यावर, कोंडवे खिंड येथील झाडे पाणी देऊन जगवण्याचे आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारत शाहूपुरीतील भारत भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या रविवारपासून श्रमदान सुरू केले आहे.

गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाच्या आरंभाचा दिवस. या शुभमुहूर्तावर सकाळी सात वाजता कोंडवेखिंड येथे श्रमदानाला सुरुवात झाली. सुमारे एक तास नागरिकांनी श्रमदान केले. जून चा पाऊस सुरू होईपर्यंत दर रविवारी सकाळी सात ते आठ या वेळात कोंडवे खिंड येथील झाडांना श्रमदान करून पाणी देण्यात येणार आहे. शाहूपुरी, दिव्य नगरी, कोंडवे आदी परिसरातील नागरिकांनी या श्रमदानात सहभागी व्हावे, असे आवाहन भारत भोसले यांनी यानिमित्ताने बोलताना केले.

श्रमदानामध्ये भारत भोसले यांच्यासह पत्रकार शैलेंद्र पाटील व प्रगतीताई पाटील, सुरेश शेटे, शाहूपुरी ग्रामपंचायत माजी सदस्य शोभा केंडे, मंगल गाडगे, अजय भोसले, अभय भोसलेसर, संजय बारंगळे, महेश जांभळे, दत्तात्रय कुचेकर, न्यासा पाटील, साईराज पवार, सौरभ पाटणे, रोहित ढेबे, अमित कुचेकर, अमित धांडे, अनिरुद्ध सावंत, राज रांजणे, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयातील संस्कार वर्गाचे विद्यार्थी नितीन खवले, राज जाधव, श्रवण साळुंखे, शौर्य भिंगारदेवे, सुरज कंठी, अनिकेत केळगणे, अथर्व भोसले, हर्ष राजे राठोड आदींनी श्रमदानात भाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. शिवेंद्रसिंहराजेंचे सातारा-जावलीतील मुस्लिम बांधवांना ईदचे 'गिफ्ट'
पुढील बातमी
मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा

संबंधित बातम्या