सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सोहळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरी होत आहे. या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी शहरातून सोमवारी पथसंचलन केले. तसेच सातारा पोलिसांच्या दंगाविरोधी पथकाची गांधी मैदानावर प्रात्यक्षिके घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के तसेच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्यासह तब्बल 200 पोलीस कर्मचारी या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते.
गणेशोत्सव तसेच येत्या तीन दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरामध्ये सातारा पोलिसांसह केंद्रीय राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी तैनात करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय खबरदारी घ्यावी, यासाठी दंगाविरोधी पथकाची गांधी मैदानावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. या प्रात्यक्षिकांचा अचानक सराव सुरू झाल्यामुळे सातारकर काही काळ आश्चर्यचकित झाले. मात्र हे मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दंगाविरोधी पथकाच्या सुमारे 30 जवानांनी ही प्रात्यक्षिके सादर केली.
सातारा पोलिसांनी सातारा शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने गोलबाग ते पोलीस कवायत मैदान यादरम्यान पथसंचलन केले. या संचलनामध्ये 200 हून अधिक पोलीस सहभागी झाले होते. या उपक्रमाविषयी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, सातारा पोलिसांना तसेच सीआरपीएफ तुकडीला आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास व्हावा म्हणून सोमवारी हे सराव सत्र आयोजित करण्यात आले होते. तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर विसर्जन सोहळ्यात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून सातारा पोलीस व सीआरपीएफ ची तुकडी तैनात राहणार आहे. त्याच्याही सरावाची रंगीत तालीम करून घेण्यात आली आहे. लखन भोसले या गुंडाचा शिक्रापूर मध्ये सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला याबद्दल प्रतिक्रिया देताना दोशी म्हणाले, महिलांच्या दागिने लूटमार प्रकरणातील तो गंभीर आरोपी होता. सातारा पोलिसांच्या एका जवानाने सेल्फ डिफेन्स मध्ये त्याचा एन्काऊंटर केला. जखमी पोलिसांची प्रकृती उत्तम आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.