सातारा : फलटण शहर व परिसरात दहशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चोरी, जबरी चोरी, खंडणीसाठी धमकावणे, मारहाण तसेच बेकायदा अग्निशस्त्र बाळगण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 10 जणांना महाराष्टत्र्व पोलीस कायदा कलम 55 अन्वये तब्बल सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीप्रमुख तुषार ऊर्फ गद्या संजय ननवरे (24, रा. झिरपेगल्ली, मंगळवारपेठ, फलटण) याच्यासह साहिल रवि तारे (24), वैभव बाळासो सस्ते (25), रोहन ऊर्फ यल्या नवीन काकडे (24), विनायक बाळासो जाधव (20), राज ऊर्फ राजू राम बोके (38), विजय दत्तू ननवरे (27), गायत्री ऊर्फ प्राची नितीन गाडे (18), सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (31) आणि राहुल रामचंद्र जगताप (26) यांचा समावेश आहे.
या टोळीला संपूर्ण सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित टोळीतील सदस्यांविरुद्ध वारंवार गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांकडून अटक व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसत नसल्याचे समोर आले. त्यामुळे या टोळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी महाराष्टत्र्व पोलीस कायदा कलम 55 अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला. या प्रस्तावाची चौकशी फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल कृष्णा खांबे यांनी केली.
पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण निखील पिंगळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर टोळीतील 10 जणांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.
सराईत गुन्हेगारांना थेट इशारा
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिसांचा कारवाईचा धडाका कायम राहणार आहे. हद्दपारीसोबतच गरजेनुसार मोक्का, एमपीडीए यांसारख्या कठोर कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे फलटणसह जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिसांच्या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके तसेच पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस आणि फलटण शहर पोलीस ठाण्यातील संतोष नाळे, बापुराव धायगुडे, जितेंद्र टीके, मुकेश घोरपडे व अतुल बडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.