साताऱ्यानजिक माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पुनरावृत्तीची गरज

अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, कास परिसरात मुक्त संचार ; नागरिक हैराण

by Team Satara Today | published on : 17 November 2025


सातारा : सातारा शहर परिसरात अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर, काससह परळी खोऱ्यातील पठार भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राणी मृत्युमुखी पडले असून गेल्या काही वर्षात वन विभागाला एकाही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही. बिबट्यांची वाढती संख्या पाहता सातारा शहरानजिक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पुनरावृत्ती करून नवीन बिबट निवारण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमीमधुन होऊ लागली आहे.

जावली आणि सातारा तालुक्याच्या उशाला सह्याद्रीच्या रांगा आहेत. सह्याद्री रांगांच्या पलीकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोयना धरण असून याच परिसरात कोयना अभयारण्य आहे. त्यामध्ये वाघ, बिबटे, नानणे, अस्वले, रानगवे, हरीण, सांबर यासारख्या वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. हे प्राणी भक्षाच्या शोधार्थ जंगलातून पठार भागात पोहचत आहेत. चाळकेवाडी, ठोसेघर पठारावरून सध्या येणाऱ्या बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या बिबट्यांचा वावर परळी खोऱ्यातील घनदाट जंगलासह सातारा येथील अजिंक्यतारा, यवतेश्वर, कास पठारावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. परळी खोऱ्यात शेळ्या मेंढ्यासह बैल, गायी या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने अनेकदा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अनेकदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळे लावले मात्र प्रत्येक वेळी बिबट्या हुलकावणी देण्यात यशस्वी ठरला आहे. 

सातारा येथून पहाटे आणि सायंकाळच्यावेळी यवतेश्वर, अजिंक्यतारा किल्ला परिसरात फिरायला जाणाऱ्या सातारकरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या काही वर्षात यवतेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल इंडस्ट्रीज झाली असल्यामुळे रात्रीच्या वेळी साताऱ्यातून अनेक कुटुंबे जेवणासाठी त्या ठिकाणी जात असतात. केवळ सातारा तालुक्याचा नव्हे तर कराड तालुक्यातही बिबट्यांचा मुक्त संचार असून काही वर्षांपूर्वी ऊसतोड मजुराच्या एका छोट्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. महाराष्ट्रभर बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असताना सातारा तालुक्यातील सह्याद्री रांगांच्या परिसरातही बिबट्यांचा वावर दिवसेदिवस वाढू लागला आहे. ही धोक्याची घंटा असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाल्यानंतर त्या तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून माणिकडोह बिबट निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये नरभक्ष झालेल्या बिबट्यासह सतत पाळीव प्राण्यांवर हल्ले करणारे बिबटे, आजारी व वयोवृद्ध झालेल्या बिबट्यांना ठेवण्यात येते. या केंद्रात वैद्यकीय पथकासह त्यांची देखभाल करण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. काही महिने बिबट्यांना या केंद्रात ठेवल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात येते. या प्रयोगामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. याच धर्तीवर सातारा तालुक्यात पठार परिसरात अशा प्रकारचे बिबट निवारण केंद्र उभा करून स्थानिकांसह वन्यप्रेमींना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

दोन्ही महाराजांनी पुढाकार घेण्याची गरज...

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे तर जावली- सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले करत आहेत. सातारानजिक वन विभागाच्या मालकीची फार मोठ्या प्रमाणावर जागा आहे. त्या ठिकाणी बिबट निवारण केंद्र उभारण्यासाठी सातारच्या दोन्ही महाराजांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत काही  सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झाडानीप्रकरणी २६ नोव्हेंबरला सुनावणी ; वळवी आणि कुटुंबियांना बजावली उपस्थित राहण्याची नोटीस
पुढील बातमी
साताऱ्यात भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी रिंगणात; सुवर्णादेवी पाटील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, 45 उमेदवारांनी भरला फॉर्म

संबंधित बातम्या