सातारा : साताऱ्यात बनावट आधारकार्ड व खोटा पत्ता दाखवून विवाह नोंदणी केल्याचा गंभीर आरोप विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गावाहिनी यांच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या संघटनांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय कृष्णा गाढवे, दुर्गावाहिनीच्या जिल्हा संयोजिका सौ. अस्मिता लाड, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विक्रांत विभुते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना भेटले. त्यांनी दिलेल्या निवेदनात विवाह नोंदणी रद्द करावी, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा आणि मॅरेज ऑफिसरला आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे कि, २६ ऑगस्ट रोजी साताऱ्यातील विवाह नोंदणी कार्यालयात परजिह्यातील दोघांनी स्पेशल मॅरेज ॲक्ट १९५४ अंतर्गत विवाहाची नोंद केली होती. मात्र, या दोघांचे साताऱ्यात वास्तव नसतानाही त्यांनी खोटा पत्ता व बनावट आधारकार्ड वापरून नोंदणी केली असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांनी आपल्या निवेदनात पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत. साताऱ्यात वास्तव नसताना बनावट पत्ता दाखवून विवाह नोंदणी का केली? संबंधित मुलीची संमती खरी आहे का, की दबावाखाली विवाह झाला आहे? बनावट आधारकार्ड कोणी तयार केले? किती अशा कार्डांचा गैरवापर सुरू आहे?
कायद्याने विवाह नोंदणीसाठी ३० दिवसांचे वास्तव आवश्यक आहे, ते दाखविण्यात कसे आले? संघटनांच्या मते, अशा खोट्या कागदपत्रांच्या माध्यमातून विवाह नोंदणीबरोबरच मालमत्ता व्यवहार, बँक खाते, मोबाईल सिमकार्ड आदी अनेक बेकायदेशीर व्यवहार होऊ शकतात. यामुळे दहशतवादी वा गुन्हेगार तत्वे खोट्या ओळखीने कायद्याला चकवा देऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.