सातारा : आषाढी वारी 2026 निमित्त पंढरपूरकडे जाणार्या लाखो वारकर्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि सुलभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष पुढाकार घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
वारी मार्गावरील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, खड्डेमुक्ती, दिशादर्शक फलक उभारणी तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यावर मंत्री भोसले यांनी विशेष भर दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने काम करून वारकर्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरला जाणार्या व परतणार्या पालख्या, भाविक आणि वारकर्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. संबंधित टोल कंत्राटदारांना राज्य शासनाकडून भरपाई दिली जाणार आहे.
आषाढी एकादशी 2026 असे नमूद असलेले विशेष पास पोलीस, वाहतूक शाखा आणि आरटीओ कार्यालयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व टोल नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, वाहतूक कर्मचारी, ट्रॅफिक वॉर्डन, सुरक्षा यंत्रणा आणि हँडहेल्ड मशिनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बेंगळुरू, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूरसह प्रमुख मार्गांवर रुग्णवाहिका, क्रेन आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार जड वाहनांवर तात्पुरती वाहतूक बंदी घालण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
याशिवाय, दर 20 ते 25 किलोमीटरवर पोलीस मदत केंद्र, रुग्णवाहिका, क्रेन आणि खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकरी वाहनांना टोलमाफी व पास वितरणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकर्यांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्व संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. वारी मार्गावरील रस्ते, पूल आणि आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे पत्रकाद्वारे कळवले आहे.