कराड : ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली. आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले आहे. या पथकाकडून मुंबईत ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासो कटरे (दोघेही रा. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. कऱ्हाडात गत काही वर्षांपासून ‘आयपीएल’वर सट्टा लावला जात आहे. वेळोवेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. मात्र, तरीही दरवर्षी ‘आयपीएल’ सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत.
अशातच गत काही दिवसांपासून शहरात काहीजण ‘आयपीएल’वर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस सट्टेबाजांचा शोध घेत होते. रविवारी याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून संदीप बडेकर व प्रथमेश कटरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
सट्टेबाजारातील साखळीचा शोध घेण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तसेच कोणाच्या वरदहस्ताखाली सट्टेबाजार चालविला जातो, याचीही माहिती पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांकडून गोपनीयरीत्या तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले असून, त्याठिकाणी छापासत्र सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.