सातारा तालुक्यात मानसिक आरोग्य पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात; आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण

by Team Satara Today | published on : 13 April 2026


सातारा : जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभाग व परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा तालुक्यात मानसिक आरोग्य विषयावर पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व आयुष्यमान आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

याविषयीचा जिल्हास्तरीय  कार्यक्रम सातारा पंचायत समिती येथे पार पडला. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून गावपातळीवर या विषयावर प्रभावी काम होणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत कॅन्सर, बीपी, शुगर यांसारख्या शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक आजारांवरही काम करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत. त्यानुसार सातारा तालुक्यात सीएचओ, एएनएम, एमपीडब्ल्यू व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण परिवर्तन संस्थेमार्फत घेण्यात आले असून, सर्वांनी प्रशिक्षणात दिलेल्या सूचनांनुसार काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ताणतणाव असतात. त्यांचा योग्य वेळी स्वीकार करून मदत घेतल्यास पुढील गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. मानसिक आजारांवर योग्य वेळी उपचार केल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. यामध्ये कुटुंब, मित्रपरिवार व समाजाचा मोठा सहभाग आवश्यक असून, त्यांनी मानसिक रुग्णांना आधार देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात या सुविधा कमी प्रमाणात असल्याने जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार , आशा समन्वयक करण जगताप, प्रकल्प समन्वयक रूपाली भोसले, योगिनी मगर तसेच आरोग्य विभागातील सीएचओ, एएनएम, एमपीडब्ल्यू व सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती होऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन; दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचा इशारा
पुढील बातमी
भरधाव पिकअपची अॅक्टिव्हाला धडक; दोघे जखमी, बोरगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

संबंधित बातम्या