सातारा, दि. १४ : कोरेगाव तालुक्यातील अंबवडे (संमत वाघोली) येथे रविवारी (दि. १४) पहाटे सुमारास चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याला ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. दरम्यान, चोरट्याने एका ग्रामस्थाच्या डोक्यात लोखंडी मेकेने वार करून जखमी केले.
वाठार पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १४ रोजी संशयित चोर पिंटू मोहन भील ((वय ४५ रा.पलासी ता. जि.नंदुरबार) हा अंबवडे संमत वाघोली गावातील वाळवंट वस्ती भवानीनगर येथील अमोल सकुंडे यांच्या बंद शेडचे कुलूप तोडून शेडमध्ये दबा धरून बसला होता. सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अमोल शेडमध्ये गेल्यानंतर चोरट्याने अमोल याच्या डोक्यात लोखंडी मेकेने वार केला. त्यावेळी अमोल याने आरडा ओरडा केला दरम्यानच्या काळात लोकांनी चोराला ताब्यात घेऊन चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच वाठार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून जखमीला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवले. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. घटनेची फिर्याद अमोल रामचंद्र सकुंडे वय ४० यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत .