सातारा : ग्रामपंचायत सदस्य जातिवाचक शिवीगाळ करून कामकाजामध्ये ढवळाढवळ करत आहेत. तसेच मानसिक छळ करून काम करण्यास रोखत असल्याची तक्रार करत माहुलीच्या सरपंच नूतन हनुमंत जाधव, ग्रामपंचायत सदस्या छाया तुपे व अंजली निकम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. घडत असलेल्या प्रकाराची तक्रार त्यांच्याकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, सचिन जाधव, ग्रामस्थ संजय जाधव व विजय पवार हे आम्ही मागासवर्गीय महिला असल्याने वारंवार जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करतात. तसेच मानसिक छळ करून अपमान जनक वक्तव्य करतात. रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहण झाले. मात्र तेथे आम्हाला बाजूला ठेवण्यात आले. गावचे पदाधिकारी असतानाही आमचा सत्कार करण्यात आला नाही. महिला वर्गाची येथे गळचेपी सुरू आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी समजला जातो. मात्र माहुली ग्रामपंचायतीत आम्हाला विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागते. येथे दुजाभावाची वागणूक मिळते, अशी तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात न्याय मिळण्याकरिता आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.