सातारा : सातारा जिल्ह्यातील शिक्षकांचे शैक्षणिक कार्य उत्तम प्रकारे सुरू असून आदर्श शाळा उपक्रम ही सुंदररित्या सुरू आहे. विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, इंग्रजी विषयातील पायाभूत कौशल्यांचा विकास लवकर झाला तर, भविष्यामध्ये त्यांची शैक्षणिक प्रगती चांगली होऊ शकते तर, सहाध्यायी अध्ययन खूप चांगले होत असल्याने तसे करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २७00 शाळांमधील साधारण ८५00 शिक्षकांशी याशनी नागराजन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून असून अहवाल २0२४ मध्ये सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरल्याने सर्वांचे कौतुकही त्यांनी केले.
आनंददायी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी, आनंददायी शनिवार या उपक्रमांमध्ये कृती आधारित शिक्षण द्यावे, प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालयाचे सक्षमीकरण करून त्याचा वापर करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करावी. शाळांमध्ये 'बुके ऐवजी बुक' हा उपक्रम राबवून वाचन चळवळ सुरू करावी. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही असावेत, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि लोकसहभाग यातून निधी मिळवून सीसीटीव्ही उपलब्ध करून घ्यावेत, विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे नागराजन यांनी सांगितले.
या ऑनलाईन शिक्षक संवादावेळी युवराज बागुल, सोमनाथ ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. माणचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शिष्यवृती परीक्षावषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. अमोल डोंबाळे यांनी मानले. संवादासाठी तांत्रिक सहाय्य किरण शिंदे, संदिप जगताप, प्रशांत भोसले यांनी केले. शिक्षक संवादा वेळी उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व सर्व शाळांचे मुख्याध्यापक हे उपस्थित होते.