कराड : कराड शहरात पिस्तूल घेऊन फिरणार्या साद अश्पाक मुलाणी (वय 23, रा. आयेशा कॉम्पलेक्स, आझाद चौक, शनिवार पेठ, कराड) या पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला अटक करून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुस असा 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील दर्गा मोहल्लाशेजारच्या पान शॉपनजीक ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील आरोपींच्या हालचाली तपासण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी शहरातील पोलीस अधिकार्यांना दिल्या होत्या.
गुरुवार पेठेतील दर्गा मोहल्ल्यानजीक एक जण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचून, साद मुलाणी याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस सापडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.