कराड : गजानन हौसिंग सोसायटी (सैदापूर, ता. कराड) येथे बंद असलेल्या दोन फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे समोर आले आहे. लिगाडे पाटील कॉलेज शेजारी असलेल्या वर्धनगार्डन हाईटस इमारतीत हा प्रकार घडला असून चोरट्यांनी सुमारे 2 तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
शनिवारी सकाळी साडेआकरा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सुधीर जयसिंग मोरे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर मोरे हे वर्धनगार्डन हाईटस इमारतीत दुसर्या मजल्यावर रहातात. शनिवारी ते बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून कपाटातील 16 ग्रॅम वाजनाचे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये असा सुमारे सव्वा लाख रूपयांचा ऐवज लांपास केला.
त्याच इमारतीत तिसर्या मजल्यावरील रत्नराज रामचंद्र सोनावले यांचाही बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे. त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटयांनी बेडरूममध्ये लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे ब्रेस्लेट असा सुमारे 77 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच इमारतीत या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळी करीत आहेत.