सातारा : देगाव, ता.सातारा येथे एकाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी दोघांना जिल्हा न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना 1 जून 2020 सालची आहे. सर्वजण परप्रांतीय मित्र असून ते कामानिमित्त सातार्यात वास्तव्य करत आहेत.
राजू मुर्मू असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकणी राजेश बुधान टुड्डु (वय 25, सध्या रा. संभाजीनगर सातारा), गणेश सोनाराम मुर्मू (वय 30, दोघे मूळ रा. झारखंड राज्य) या दोघांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दि.1 जून 2020 रोजी सकाळी आरोपी यांनी राजू मुर्मू यांना जेवण करण्यासाठी बोलवले होते. तेथे तिघांनी दारु पिल्यानंतर झारखंड येथील गावाकडील सायकल चोरीच्या कारणातून वादाला सुरुवात झाली. दोन्ही आरोपींनी आपआपसात संगनमत करुन दुचाकीवरुन राजू यास देगाव येथे नेवून त्याचा खून केला. दगडाने तोंडावर, डोक्यात मारुन त्याचा खून करत मृत व्यक्तीचे ओळख न पटण्यासाठी मोबाईल व पाकीट काढून पुरावा नष्ट केला.
खुनाची घटना समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोनि सजन हंकारे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षाचा युक्तीवाद आणि या प्रकरणातील 13 साक्षीदारांच्या साक्षी तपासून न्यायालयाने संबंधितांना जन्मठेप व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.