कराड : कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय आणि सीमा सुरक्षा यंत्रणेची परवानगी न घेता भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. शहरालगतच्या मुंढे येथील 'सह्याद्री रेसिडेन्सी'मध्ये हे नागरिक वास्तव्यास होते. या कारवाईत एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या देशात बांगलादेशी नागरिकांच्या बेकायदेशीर वास्तव्याचा मुद्दा गाजत असताना, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मुंढे परिसरात काही संशयास्पद व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या पथकाने सह्याद्री रेसिडेन्सी येथे छापा टाकला.पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या नागरिकांकडे चौकशी केली असता, त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी मुंबईतून बनावट पत्त्यावर आधारित आधारकार्ड तयार करून घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी बिलाल सलाल उद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
परकीय नागरिकांना कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता आश्रय दिल्याप्रकरणी करण बापू कांबळे (वय २९, रा. मुंढे, मूळ रा. किवळ, ता. कराड) याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कराड परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.