बेकायदा पिस्टल घेऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बोरगाव डीबी पथकाची मोठी कारवाई; पाच घरफोड्यांचे गुन्हे उघड, ८.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 20 November 2025


सातारा : बोरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सर्व घटनांमागील अट्टल आणि अत्यंत हुशार टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात बोरगाव डीबी पथकाला मोठं यश मिळालं आहे. चोरी, घरफोडी, बेकायदा पिस्टल बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या या टोळीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोठा मुद्देमाल जप्त केला.

दि. १८ नोव्हेंबरला प्रभारी अधिकारी डी. एस. वाळवेकर आणि सहायक पोलीस निरीक्षकांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की,  नवनाथ गोळे आणि त्याचे दोन साथीदार आष्टे (पुर्नवसन) परिसरात बेकायदा पिस्टल घेऊन फिरत आहेत. पोलिसांनी महादेव मंदिर परिसरात सापळा रचला.  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नंबरप्लेटविरहित करिझ्मा मोटारसायकलवर तिघे दिसताच पथकाने अचानक छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं.

अंगझडतीत नवनाथकडे देशी बनावटीचं पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे, तर इतर दोघांकडे मोबाईल फोन, कटर, कटावणी, रोख रक्कम आणि दोन मोटारसायकली मिळाल्या. एकूण ₹५,०६,१००/- किमतीचा मुद्देमाल तिथेच जप्त करण्यात आला. नवनाथ प्रकाश गोळे (२७), ऋषिकेश सूर्यकांत सुळ (२४), सुदर्शन अशोक मोहिते (२७) – यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्यांच्या टोळीतील आणखी एक साथीदार कृष्णा नरडे याची माहिती मिळाली. चौकशीदरम्यान आरोपींनी बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांत झालेल्या पाच घरफोड्यांची कबुली दिली.

या घरफोड्यांमध्ये सोन्या–चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम आणि घरफोडीला वापरलेली साधनं मिळून एकूण ₹८.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळालं. आरोपी घरफोडी करण्यासाठी प्रथम परिसराची रेकी करत, नंतर कटरने दरवाजे फोडून चोरी करत आणि बनावट नंबरप्लेट लावलेल्या मोटारसायकलीने पसार होत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. गुन्हा अत्यंत गुंतागुंतीचा, तांत्रिक माहिती आणि सतत ठिकाण बदलणाऱ्या आरोपीमुळे पोलिसांसाठी आव्हानात्मक होता. तरीही पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवत शेवटी टोळीला जेरबंद केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहा. पोलीस निरीक्षक धोळीराम बाळवेकर, पोउनि दिपक कारळे, पोउनि सुधीर भोसले, व इतर अंमलदारांचा समावेश होता. या कारवाईमुळे बोरगाव परिसरातील घरफोड्यांच्या गुन्ह्यांची मालिका थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेच्या जाचहाटप्रकरणी पतीसह ४ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
फलटणला आज श्रीराम रथोत्सव; रथ परंपरागत मार्गाने नगरप्रदक्षिणा पूर्ण करून, सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार

संबंधित बातम्या