विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार; नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पदग्रहणानंतर तेजस्विनी घोरपडे यांची भूमिका

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : भाजप महिला मोर्चाची नूतन जिल्हा कार्यकारिणी जिल्ह्यातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा तेजस्विनी घोरपडे यांनी व्यक्त केला. महिला सक्षमीकरण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार आणि स्वावलंबन या विषयांना संघटनेच्या कामकाजात अग्रक्रम दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यापूर्वी भाजप महिला मोर्चाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सुरभी भोसले, ऐश्वर्या पाटणकर यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या, विकसित भारत-२०४७ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी महिला शक्तीची सक्रिय भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हाभर जनसंपर्क, जनजागृती आणि संघटन बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे. अनुभवी आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून महिला मोर्चाचे कार्य अधिक व्यापक केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, जिल्ह्यात वाढत असलेल्या ॲनिमियाविरोधात जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे आणि विविध उपक्रम राबविण्यात येतील. तसेच रोजगार, स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे 'देवाभाऊ कृषी माऊली सोहळा' आयोजित करण्यात येणार असून, शेती करणाऱ्या महिलांचा सन्मान व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवा, सामाजिक बांधिलकी आणि संघटन विस्ताराचे उपक्रम जिल्हाभर सातत्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उषा शिंदे, कल्पना जाधव, प्रगती साळुंखे, वंदना सावंत, शिलादेवी पाटणकर, सुनीता टोपले, स्नेहल जाधव, रेहिणी क्षीरसागर, अश्विनी हुबळीकर, पायल जाधव आदी उपस्थित होत्या.

पत्रकार परिषदेत विविध विषयांवर पक्षाची भूमिका

पत्रकार परिषदेत 'लाडकी बहीण' योजना, राम मंदिर, सासपडे येथील पीडितेला न्याय, अंगणवाडी सेविकांचे आंदोलन आणि शेतकरी कर्जमाफी आदी समकालीन विषयांवर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. तेजस्विनी घोरपडे यांनी विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत प्रश्नांना उत्तरे दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीट परीक्षेतील घोळाने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर; परीक्षेनंतर ही निकालात घोळ
पुढील बातमी
वाई एमआयडीसीतील धक्कादायक घटना; फाउंड्रीच्या धगधगत्या भट्टीत उडी घेतल्याने परप्रातींय कामगाराचा मृत्यू, आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

संबंधित बातम्या