जावलीच्या शिवारात समाधानकारक पावसामुळे भातलागणीच्या कामांना चांगलाच वेग

by Team Satara Today | published on : 22 July 2026


मेढा : जावळी तालुक्यातील मेढा, केळघर, कुसुंबी, बामणोली, चिकणवाडी, सांगवीमुरा, कुसुंबीमुरा आदी भागांतील शेतशिवारात सध्या भातलागणीची लगबग सुरू असून शेतकरी कुटुंबे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीच्या कामात व्यस्त आहेत. समाधानकारक पावसामुळे भातलागणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. 

जावलीत सध्या पडत असलेल्या पावसामुळे भाताचे तरवे जोमदार तयार झाले आहेत. शेतात पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू असून अनेक ठिकाणी भातलागवड पहिल्या टप्प्यात पोहोचली आहे. महिला-पुरुष शेतमजूर आणि शेतकरी पारंपरिक पद्धतीने भातलागण करत असल्याने संपूर्ण परिसरात कृषी कामांची लगबग पाहायला मिळत आहे.

जावली तालुक्याच्या दक्षिण व पश्चिम पट्ट्यात भात हे प्रमुख खरीप पीक असून यंदा अनुकूल हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांतील अनिश्चित पावसामुळे निर्माण झालेली चिंता यंदा काही प्रमाणात जाणवली होती परंतू जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पेरणीला व भातलागण सुद्धा चांगल्या पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे पुढील काही दिवस पावसाचा संतुलित जोर कायम राहिल्यास भातपिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होईल.

त्यामुळे वेळेवर खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पिकाची नियमित पाहणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. जावली तालुक्यातील शेतशिवार पुन्हा एकदा हिरवाईने नटू लागले असून भातलागणीच्या गडबडीत ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाई तालुक्यातील जोर येथे २४ तासांत १०० तर पाटणमधील नवजा येथे ८५ मिलिमीटरची नोंद; कोयना धरणातीलपाणीसाठाही ६२ टीएमसीवर
पुढील बातमी
तासवडे टोलनाका परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ हजार ४५० वाहनांवर कारवाई; १२ लाख रुपयांचा दंड वसूल

संबंधित बातम्या