फलटण : येथील श्रीराम रथोत्सवाचा उद्या, दि. २१ रोजी (मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा) मुख्य दिवस असून, रथ परंपरागत मार्गाने नगरप्रदक्षिणा पूर्ण करून, सायंकाळी श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे.
यानिमित्त शुक्रवारी (दि. 21) सकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिरात कीर्तन झाल्यानंतर प्रभू रामचंद्राची मूर्ती राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते रथामध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रथ मिरवणूक परंपरागत मार्गावरून मार्गस्थ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन फिरून रथ सायंकाळी 7 वाजता श्रीराम मंदिरात परत येईल.
त्यानंतर शनिवारी (दि. 22) श्रींची पाकाळणी, सकाळी काकड आरती, लघुरुद्र व महापूजेनंतर रथयात्रेची सांगता होणार आहे. श्रीराम मंदिर परिसर आणि रथ मार्गावर पालिकेकडून स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रथयात्रेसाठी पोलिस बंदोबस्त तैतान करण्यात येणार आहे.
पुरातन श्रीराम मंदिर व दत्त मंदिराच्या शिखराचे काम राजस्थानी कलाकारांनी उत्तम केले आहे. मंदिर परिसरातील पुरातन ओवर्या व मंदिराच्या भिंतींचे अंतर्बाह्य काँक्रिटीकरण व सुशोभिकरण करण्यात येत आहे. हे काम पाच-सहा महिन्यांत पूर्ण होऊन, मंदिर परिसराला नवी झळाळी मिळणार आहे.