सातारा जिल्हा बँकेची वित्तीय शिस्त कायम ठेवा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे संचालक मंडळाला कळकळीचे आवाहन

by Team Satara Today | published on : 02 October 2024


सातारा : सहकार क्षेत्रात काम करणार्‍या बँकांनी वित्तीय क्षेत्रात जर काटेकोरपणा पाळला तर त्याचा फायदा सहकारामध्ये काम करणार्‍या बँका, विकास सेवा सोसायटी यांना होऊन त्याची फळे प्रत्यक्षपणे शेतकर्‍यांना मिळतात. सातारा जिल्हा बँकेने शेतकर्‍याचे जीवनमान उंचावले आहे. गेली 17 वर्षे बँकेचा एनपीए शून्य आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काटेकोरपणे आर्थिक नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून केले.

सातारा जिल्हा बँकेच्या अमृत महोत्सवी सांगता समारंभानिमित्त सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित सोहळ्यात अजितदादा बोलत होते. यावेळी कार्यक्रमास खासदार व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आनंदराव पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, अभिनेते राहुल सोलापूरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष यशवंत दुर्गाडे, महेश कदम, संजय सुद्रिक इत्यादी उपस्थित होते.

अजितदादा पुढे म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे, ही अभिमानाची बाब आहे. 1999 मध्ये आम्ही या बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्वोत्तर आणि पश्चिम उत्तर विचित्र भौगोलिक परिस्थितीनुसार सातारा जिल्हा बँक अभ्यास करून शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करत असते. 75 वर्षांपूर्वी बँकेची स्थापना झाली तेव्हापासून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होऊ लागली आहे. आर्थिक शिस्त लागली तरच बँक टिकते अन्यथा बँकेत घोटाळे होत असतात. पण सातारा जिल्हा बँकेत वित्तीय शिस्त आहे. अन्यथा संस्था अडचणीत आली तर त्याची किंमत शेतकर्‍यांना आणि संचालक मंडळालाही मोजावी लागते. अध्यक्ष नितीन पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बँकेची वित्तीय शिस्त पाळावी. बँकेच्या प्रगतीला कोणाचीही नजर लागू देऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. सातारा जिल्हा बँकेचा एनपीए गेली 17 वर्षे शुन्य टक्के आहे. नैसर्गिक संकट आले तरी बँक तावून सुलाखून पुढे जात आहे. सर्वसामान्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी बँकेने मोलाची भूमिका बजावली आहे असे ते म्हणाले. शेतकर्‍यांना मागील वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजना पुढील पाच वर्षात कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी आपणही या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून सहकार्य करावे, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना मोबदला चांगला द्यावा. दूध उत्पादकांनाही ऑक्टोबर पासून सात रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजितदादा यांनी सांगितले. समाजामध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे असा नारा काही जण वाचाळवीर देतात. मात्र प्रत्यक्षात ते तसे वागत नाहीत. जे वाचाळवीर आहेत अशा लोकांच्या वक्तव्याकडे आपण दुर्लक्ष करावे, असा राजकीय टोला त्यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला. वसना व वांगना या पाणीपुरवठा योजना आम्हाला सोलरवर आणायच्या आहेत. ही शेतकर्‍यांची बर्‍याच वर्षाची मागणी आहे. दिवसा वीज देण्याची ही मागणी आम्ही पूर्ण करणार आहोत. यासाठी सोलरवर चालणारे पंप देणार आहोत. ही वीज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राहणार आहे, असे ते म्हणाले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, जिल्हा बँकेच्या सर्व संचालकांनी राजकारण कधी जिल्हा बँकेच्या कारभारात येऊ दिले नाही. त्यामुळेच बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावलेला आहे. कारखाने यांनी घेतलेले कर्ज वेळेवर देत असतात. अगदी शेतकर्‍यांचे कर्ज उसाचे पैसे आले की कर्ज कपात होऊनच बँक खात्यात वर्ग होत असल्याने बँकेला कोणती अडचण येत नाही. बँकेचे संचालक हे नाबार्ड बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याचा बँकेला निश्चितच फायदा होणार आहे. जिल्हा बँकेने अधिकाधिक प्रगतीची शिखरे पदाक्रांत करावी, या शब्दात शंभूराज देसाई यांनी जिल्हा बँकेला शुभेच्छा दिल्या.

रामराजे निंबाळकर म्हणाले, आम्ही सर्व संचालक बँकेच्या अमृत महोत्सव सोहळ्यात काम करत आहोत. हा अमृत महोत्सवी सोहळा कायम स्मरणात राहणार आहे. सर्वसामान्य शेतकरी पिक कर्ज घेतात ती वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतल्यामुळे बँकेची वाटचाल चांगली चालली आहे, याचे सर्व श्रेय शेतकर्‍यांना आहे. आज डिजिटल बँक चालवण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य होत आहे. बँकेच्या वाटचालीमध्ये बँक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून आपण काम करूया असे ते म्हणाले.

जिल्हा बँकेचे चेअरमन आणि खासदार नितीन पाटील यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकामध्ये त्यांनी जिल्हा बँकेच्या एकंदर प्रगतीचा आढावा घेतला. 18 हजार कोटीचा व्यवसाय 319 शाखांच्या माध्यमातून करण्यास बँक यशस्वी झाली आहे. बँकेने यावर्षी 12 टक्के डिव्हिडंड दिला आहे. शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे याकरिता बँक तीस ते चाळीस लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर आणि कर्ज देत असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या पूर्वी जिल्हा बँकेच्या इन्फोसिस फिनॅकल सॉफ्टवेअरचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या अर्थप्रणालीला सायबर क्राईम चा धोका यामुळे टाळला जाणार आहे व ग्राहक सेवा सुलभिकरण शक्य होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले, तर राजेंद्र सरकाळे यांनी आभार मानले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भक्ती-शक्तीच्या उत्सवाला उद्यापासून सुरुवात
पुढील बातमी
आळजापूर येथील परमिट दुकानाचा फेर अहवाल मागवणार

संबंधित बातम्या