सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या, डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांना सुवर्णपदक

68 व्या ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत केली सुवर्ण कामगिरी

मुंबई : झारखंड राज्याची राजधानी रांची येथे 68 वी ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धा 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत स्फोटक शोधणे या प्रकारात महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ हे या स्पर्धेत सहभागी झाले होते. श्वान सूर्या अन् डॉग हॅन्डलर निलेश दयाळ यांनी सुवर्णपदक मिळवत यश संपादन केलं आहे.

झारखंडच्या रांची येथे 68 वी ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 29 राज्य 2 केंद्रशासित प्रदेश आणि 7 सैन्यदलांचे स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये सातारा पोलीस दलाचा बॉम्ब शोधक आणि नाशक पथकातील श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर निलेश दयाळ यांनी सुवर्णपदक मिळवलं.

स्फोटके शोधणे या प्रकारात लेब्राडोर ही पूर्वपार चालत आलेली जात कमी करून नव्याने ऊर्जावान म्हणून बेल्जियम शेफर्ड या जातीचा समावेश केला आहे. या प्रत्येक ब्रीडची किंमत अंदाजे एक ते दीड लाख रुपयांच्या दरम्यान असते. या स्पर्धेमध्ये भरपूर बेल्जियम मिलोनाइज होते. त्यामध्ये वय वर्षे आठ रनिंग लेब्राडोर जातीच्या श्वान सूर्याने आपण म्हातारा झालो नाही आहोत, हे यश मिळवून दाखवत सिद्ध केले. अजिंक्यतारा च्या कुशीत सतत दोन वर्षे अखंड सराव करून त्या सरावाचे फळ मिळाले आहे. ही भारतातील या प्रकारातील सर्वात मोठी स्पर्धा आहे.

विशेष बाब म्हणजे यापूर्वी स्फोटक शोधणे या प्रकारात सातारा पोलीस दलाचा श्वान सूर्या आणि डॉग हॅन्डलर पोलीस हवालदार निलेश दयाळ यांनी संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक मिळवत रौप्य पदक मिळवले होते.महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात यश मिळवल्यानंतर झारखंडच्या रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यासाठी निवड झाली होती. 19 वा राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पुणे येथे 7 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत पडला होता.

वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ, नवनवीन तंत्रज्ञान यामुळे गुन्हेगारी आणि गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे अशावेळी पोलीस आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्ये याच्या मदतीने गुन्हेगारी रोखत असतात घडलेल्या गुन्ह्याचा जलद तपास लावत असतात. पोलिसांनी अधिक सक्षम आणि सजग राहावे यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. दरम्यान, श्वान सूर्यानं अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात सातारा पोलिसांना मदत केली आहे. देश पातळीवर चमकदार कामगिरी मिळवल्याबद्दल महराष्ट्र आणि पर्यायाने सातारा पोलीस दलाचे अभिनंदन होत आहे.



मागील बातमी
शनैश्वर देवस्थानच्या नंदगिरी महाराजांची विनयभंगाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता
पुढील बातमी
अनाधिकाराने घरात प्रवेश केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या