सातारा : कारंडवाडी, ता. सातारा येथील बसस्थानक परिसरात तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडल्याच्या घटनेने सोमवारी रात्री परिसरात खळबळ उडाली. ऋषिकेश संतोष माने (वय 28) यांच्यावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महेश जालिंदर माने याच्यावर आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी ऋषिकेश माने यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, सोमवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास ऋषिकेश माने हे मित्रांसोबत जेवण झाल्यानंतर कारंडवाडी बसस्थानक परिसरात गप्पा मारत चालले होते. त्यावेळी महेश माने हा बुलेट दुचाकीसह रस्त्यावर उभा होता.
मित्रांसह जात असलेल्या ऋषिकेश यांना पाहून संशयिताने त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि दमदाटीत झाले. त्यानंतर संशयिताने कमरेला लावलेले पिस्तूल काढून तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आणि ऋषिकेश यांच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे.
अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित पिस्तूल बेकायदा असल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी महेश जालिंदर माने याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस करीत आहेत.
कारंडवाडीत बसस्थानक परिसरात गोळीबाराचा थरार; तरुणाच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडल्याने खळबळ; ग्रामस्थांनी पकडले संशयिताला
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा