सातारा : सातारा शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय कायमची दूर व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. आंगामी काळात शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करून शहरातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. यापैकी ८ कोटी २५ लाख रुपये निधीतून शहरातील भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर, पदाधिकारी आणि प्रभाग क्र. ५ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा शहरात रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काँक्रीटीकरण करण्याचे पहिले काम यानिमित्ताने सुरु झाले आहे. भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक या रस्त्याची नेहमीच दयनीय अवस्था होत असे. त्यावर काँक्रिटीकरणामुळे कायमस्वरूपी तोडगा निघाला असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. रस्त्याचे काम दर्जेदार होणार असून काम पूर्ण झाल्यांनतर या रस्त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांची होणारी गैरसोय कायमची दूर होणार असल्याचे ते म्हणाले.