मांडवे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील लाखो रुपयांच्या केबलची चोरी; शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण

by Team Satara Today | published on : 18 May 2026


सातारा : मांडवे, ता. सातारा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल जाळून अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. आतापर्यंत वर्षभरात 3 ते 4 वेळा असे प्रकार घडले आहेत. पोलिसांना वेळोवेळी कल्पना दिली तरीही पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

मांडवे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावावर सुमारे 150 ते 200 शेतकऱ्यांचे विद्युत पंप आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे तलाव कधी कधी पुर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाण्याविना आपली पिके जळून जात आहेत. काही वेळा नाईलाजास्तव पिकावर रोटर मारावा लागत आहे. दरवर्षी तलावाच्या बाजूने पाणी उपसा करण्यासाठी 300 ते 400 फूट केबल वायर टाकून मोटारद्वारे पाणी उपसा केला जात आहे. दरवर्षी अज्ञात चोरटे या केबलवर डल्ला मारत आहेत. केबल चोरीस गेल्यास शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे.

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतू आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांची केबल चोरीस गेली आहे. त्यांना त्याची केबल पुन्हा परत मिळालेली नाही. तसेच पोलिसांनी या चोरीचा आजपर्यंत छडा लावलेला नाही. त्यामुळे पोलिसांचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये नक्की दोष कोणाचा आहे? अनेक शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था, सोसायट्यांचे कर्ज काढून तलावात विद्युत पंप टाकून पाईप लाईन केली आहे.

रविवारी सकाळी शेतकरी विद्युत पंप चालू करण्यासाठी मांडवे तलावाच्या ठिकाणी गेले असता सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाचे केबल जाळल्याचे निदर्शनास आले. त्यामधील कॉपर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामुळे पिके करपू लागली आहेत. त्यातच केबल चोरीला गेल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावरील कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही : ना. मकरंद पाटील, कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
पुढील बातमी
शिवकालीन वारशाचा ठेवा खुला; साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात नवी तीन दालने

संबंधित बातम्या