व्हीपभंग प्रकरण : राष्ट्रवादीच्या त्या तीन सदस्यांना नोटीस; २९ एप्रिलला बाजू मांडण्याची संधी

by Team Satara Today | published on : 23 April 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत व्हीपचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांविरुद्ध सध्या अपात्रतेची कारवाई सुरू आहे. या प्रकरणाची महत्त्वपूर्ण सुनावणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. आजच्या सुनावणीदरम्यान प्रकरणाची प्राथमिक तपासणी पूर्ण करण्यात आली असून, संबंधित तिन्ही सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २९ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

​राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते उदय कबुले यांनी या तीन सदस्यांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे ही अपात्रतेची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही संपूर्ण सुनावणी प्रक्रिया विहित कालमर्यादेत म्हणजेच ९० दिवसांच्या आत पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​आज झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडताना वकील ॲड. दत्तात्रेय घोडके यांनी हे प्रकरण कायदेशीर तरतुदीनुसार लवकरात लवकर निकाली काढावे, असा अर्ज सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जाची दखल घेतली असून, पुढील टप्प्यात संबंधित सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागेवाडीत आयटी पार्कचा मार्ग मोकळा; शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना मोठे यश
पुढील बातमी
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत

संबंधित बातम्या